नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सध्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठे शाब्दिक युद्ध रंगले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत अतिशय गंभीर आरोप करत निशाणा साधला होता. त्यानंतर हे दोन्ही नेते आज एका शासकीय उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच मंचावर समोरासमोर आले आहेत.
नागपूर येथील सुरेश भट सभागृहामध्ये हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न होत आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रांचे नागपूर शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आज होत आहे.
या तिन्ही आरोग्य केंद्रांचा व्हर्च्युअल पद्धतीने आज लोकार्पण सोहळा होत आहे. या तीनपैकी दोन आरोग्य केंद्रं ही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर देखील या दोन्ही नेत्यांमधील नाराजीनाट्य उघडपणे दिसून आले.