पॅरिस : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऐतिहासिक कामगिरी करताना उपांत्य फेरी गाठली. गुरूवारी त्याने त्याचा सहकारी प्रणॉयला चीतपट केले होते. आज शुक्रवारी तगड्या खेळाडूला पराभूत करण्यात लक्ष्यला यश आले. लक्ष्य सेनने बॅडमिंटन पुरुष एकेरीत चौ तिएन चेनचा १९-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव केला. विशेष बाब म्हणजे ऑलिम्पिकच्या इतिहासात बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आता लक्ष्य तमाम भारतीयांचे लक्ष्य अर्थात पदक मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेनला पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रतिस्पर्धी खेळाडू वरचढ ठरल्याने भारतीयांची धाकधूक वाढली. पण, जिद्द न हरता त्याने विजयाच्या दिशेने कूच केली. पहिल्या गेममध्ये भारताचा शिलेदार २१-१९ असा पिछाडीवर होता. परंतु, लक्ष्य सेनने चमकदार कामगिरी करत दुसरा गेम जिंकला. त्याने २१-१५ अशा फरकाने विजय नोंदवला. या घडीला सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता. पण, अखेर २१-१२ असा विजय मिळवण्यात लक्ष्यला यश आले.
दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने रविवारी पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.