इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा स्थापन केली आणि महायुतीत वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे इंदापूरची विधानसभा हर्षवर्धन पाटील अपक्ष लढवू शकतात, असे बोलले जात आहे. दरम्यान, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभा निवडणूक लढविणारच, असे म्हटले आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुकीवेळी मी, आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विस्ताराने चर्चा केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य असेल, असे ठरले होते. अजून यासंबंधीच्या निर्णयापर्यंत ती प्रक्रिया आलेली नाही. त्यामुळे लोकसभेवेळी जी चर्चा झाली, त्याबाबतची स्पष्टता जागा वाटपाच्यावेळी होईल, असा विश्वास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणारच. परंतु ते कशी निवडणूक लढणार, ते आताच सांगणार नाही, असे सांगत त्यांनी गूढ कायम ठेवले. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.