25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रफडणवीसांनी महाराष्ट्राचे वस्त्रहरण केले

फडणवीसांनी महाराष्ट्राचे वस्त्रहरण केले

सचिन वाझेंच्या आरोपानंतर नाना पटोलेंची खोचक टीका

पुणे : प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे वस्त्रहरण केले आहे, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे.सचिन वाझेंनी केलेल्या आरोपानंतर पटोलेंनी थेट फडणवीसांना लक्ष्य केले. फडणवीस आणि अनिल देशमुख यांचे हे नाट्य सुरू आहे, ज्याचा काही अंत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आमचे सरकार येईल, तेव्हा आम्ही याचा निकाल लावू, असे म्हणत पटोलेंनी महायुतीला थेट इशाराच दिला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीतही जागांची अदलाबदल होऊ शकते, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जागांची अदलाबदल करण्याची भूमिका नरमाईची वाटते का? असा प्रश्न विचारला असता आता ते अजित दादा आम्हाला पूर्वीसारखे दिसत नाहीत,अशी खिल्लीही पटोलेंनी उडवली.

पुढची पाच वर्षे शेतक-यांना वीज बिल मोफत करणार म्हणजे करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचारही नाना पटोलेंनी घेतला. ऐन निवडणुकांच्या तोंडावर अशा घोषणा केल्या जात आहेत. यात काहीही तथ्य नाही. निवडणुकांच्या अनुषंगाने वाट्टेल ती आश्वासने सरकार देत आहे. मात्र वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचे वाढते प्रमाण इत्यादी बाबींवर हे सरकार का बोलत नाही? जे खातंच ज्यांच्याकडे नाही ते वाट्टेल त्या घोषणा करत सुटल्याचेही नाना पटोले म्हणाले.

फडणवीसांचे डर्टी पॉलिटिक्स : राऊत
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे डर्टी पॉलिटिक्स केले असल्याचेही राऊत म्हणाले. गृहमंत्री म्हणून फडणवीस सध्या आरोपीच्या वक्तव्यावर टाळ्या वाजवत आहेत. स्वत: फडणवीस वकील आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करत असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीस हेच या राजकारणाचे सूत्रधार असल्याचे राऊत म्हणाले. कधीकाळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आमच्या जवळचे होते. अमित शहा हे देखील जवळचे होते. पंतप्रधान मोदी हे देखील जवळचे होते. पण आज हे काय करतात ते महत्त्वाचे असल्याचे राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR