ढाक्का : वृत्तसंस्था
बांगलादेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा जोरदार निदर्शने सुरू झाली. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांसह सर्व न्यायाधीशांना तासाभरात राजीनामा देण्यास बजावले. वाढता विरोध पाहून बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्या निवासस्थानावर हल्ला करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. काही दिवसापूर्वी प्रचंड विरोध झाल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरन्यायाधीशांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत शेकडो आंदोलकांनी, बहुतांश विद्यार्थ्यांनी शनिवारी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला होता.
मुख्य न्यायाधीश अंतरिम सरकारला बेकायदेशीर घोषित करण्याचा कट रचत आहेत. फॅसिस्ट अंतरिम सरकारला बेकायदेशीर घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि मुख्य न्यायमूर्तींचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच आम्ही मुख्य न्यायाधीशांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलात आलो आहोत, असे अब्दुल मुकाद्दिम यांनी सांगितले.
अंतरिम सरकारच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार असिफ महमूद यांनीही मुख्य न्यायाधीश ओबेदुल हसन यांचा बिनशर्त राजीनामा आणि पूर्ण न्यायालयाची बैठक रद्द करण्याची मागणी केली.