नवी दिल्ली : उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि ‘एच ९ एन २’ संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
चीनमध्ये आढळलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा (एच ९ एन २) आणि श्वसन रोगांचा धोका भारताला कमी आहे. चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणा-या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डब्ल्यूएचओने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात या संसर्गाचा मानव ते मानव प्रसार होण्याची शक्यता कमी आहे आणि आतापर्यंत आढळलेल्या ‘एच ९ एन २’ प्रकरणांमध्ये मृत्यूदर कमी आहे असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनमध्ये पसरणा-या न्यूमोनियासारख्या गूढ आजाराने नेपाळचीही चिंता वाढवली आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर नेपाळने अलर्ट जारी केला असून आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. चीनने या आजाराबाबत माहिती न दिल्याने नेपाळने नाराजी व्यक्त केली आहे. नेपाळमधील आरोग्य अधिका-यांनी सांगितले आहे की चीनमधील न्यूमोनियाच्या गूढ उद्रेकाबद्दल कोणत्याही एजन्सीने त्यांना अलर्ट केले नाही. त्यांच्या देशातही या ऋतूत असे आजार होतात. अशा परिस्थितीत त्यांनी याबाबत माहिती द्यायला हवी होती पण तसे झाले नाही. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या या वक्तव्यानंतर नेपाळने अलर्ट जारी केला आहे.
नेपाळमध्येही अलर्ट जारी
नेपाळच्या नॅशनल पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीचे संचालक डॉ. रंजन भट्ट यांनी सांगितले की, इन्फ्लूएंझा, कोविड आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल हे नेपाळमध्ये पसरणारे सामान्य व्हायरस आहेत. ज्यामुळे न्यूमोनिया होतो. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि न्यूमोकोकस संसर्ग विशेषत: या हंगामात लहान मुलांमध्ये होतो. उत्तर चीनमध्ये सुरू असलेल्या रहस्यमय न्यूमोनियाच्या उद्रेकासाठी हेच विषाणू आणि जीवाणू जबाबदार असल्याचे मानले जाते. हे सर्व विषाणू आणि बॅक्टेरिया आपल्या देशातही आहेत, त्यामुळे आम्ही संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि नियमित निरीक्षण करत आहोत.