जालना : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा जालना जिल्ह्यात पोहोचली असून, शेतकरी, युवकांसह संपूर्ण जनतेचे प्रश्न समजून घेत ही यात्रा मजल दरमजल करीत नागपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहे. या यात्रेदरम्यान आज मंठा (जि. जालना) येथील पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. या प्रवासात भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत.
पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांना चारा-पाणी नाही आणि जे कापूस, सोयाबीन उत्पादन निघाले, त्याला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतक-यांना मदतीची गरज आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने दुष्काळासंदर्भात जीआर काढला. परंतु तो गोंधळ निर्माण करणार असून, यात शेतक-यांना मदतीसंदर्भात स्पष्टता नाही. तसेच भरतीच्या नावाखाली युवकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा दिवाळी पाडव्यापासून सुरू झाला. आजपर्यंत त्यांनी अडीचशे कि.मी. पेक्षा जास्त अंतर कापले असून, त्यांची ही यात्रा जालना जिल्ह्यात असून, आज त्यांनी मंठा येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराची पुरती चिरफाड केली. ही युवा संघर्ष यात्रा राज्यातील शेतकरी, युवकांसह सर्वांचेच प्रश्न जाणून घेण्यासाठी काढण्यात आली असून, गावोगावचे प्रश्न समजून घेतानाच गावकरी, लोकांशी संवाद साधण्यात येत आहे. ही संघर्षयात्रा थेट नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. १३ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवशी नागपुरात त्यांच्यासह उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे दिल्लीतील नेते यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतली जाणार आहे. त्यानंतर हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाणार आहेत, असेही आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले.
राज्यात कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव होता. मात्र, ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केल्याने कापसाचे भाव ६ हजारांपर्यंत खाली आले. सोयीबीनचे भावही ४ ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. त्यातच सध्या राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु नेमकी किती मदत करणार, याबाबत सरकारच्या जीआरमध्ये स्पष्टता नाही. तसेच दुष्काळामुळे शेतक-यांना मुलांची फीस भरायला पैसे नाहीत. त्याबाबतही स्पष्टता नाही. दुसरीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षकांच्या भरतीबाबतही वेळोवेळी सांगितले गेले. परंतु यातूनही युवकांची दिशाभूल केली जात आहे. यासह जवळपास ३५ मुद्दे घेऊन आम्ही जनतेशी संवाद साधत असून, आगामी हिवाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडून जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा विश्वासही आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
या युवा संघर्ष यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सामाजिक कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता यात सहभागी होत आहे. याबद्दल सर्वांचे आभार मानत आमदार रोहित पवार यांनी या माध्यमातून जनतेचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.