नवी दिल्ली : विनेश फोगाट ही पॅरिसहून भारतात परतली. विनेश भारतात येणार असल्याने दिल्ली एअरपोर्टवर विनेशच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. विनेशचे दिल्ली एअरपोर्टवर आगमन झाल्यावर तीच्या चाहत्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. ढोल नगा-याच्या ठेक्यावर चाहत्यांनी नृत्य करत तिचे जल्लोषी स्वागत केले. यावेळी आपल्या चाहत्यांचा उत्साह पाहून विनेश भावूक झाल्याचे दिसून आले. यावेळी तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसून आले. दिल्ली एअरपोर्टपासून गाव बलाली पर्यंत विनेशचे स्वागत करण्यात येणार आहे. गावातले नागरिकही स्वागतासाठी उत्साहित असल्याचे दिसून आले.
दिल्ली एअरपोर्टवर विनेशचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी स्वागत केले. विनेश चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारत तिचे गाव बलालीला जाणार आहे. विनेशच्या घरी परतण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरून तिच्या गावी बलाली पर्यंत स्वागताची तयारी करण्यात आली आहे. विनेशचा भाऊ हरंिवदर म्हणाला विनेश देशात परतत आहे. दिल्ली विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी लोक आले आहेत. आमच्या गावातही लोक त्यांच्या स्वागताची वाट पाहत आहेत. विनेशला भेटून तिला प्रोत्साहन देण्यासाठी लोक उत्सुक आहेत.
विनेशची कुस्तीतून निवृत्ती
अपात्र ठरल्यानंतर विनेशने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, आता तीने निवृत्तीतून पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. विनेशने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, कदाचित वेगवेगळ्या परिस्थितीत मी २०३२ पर्यंत स्वत:ला खेळताना पाहू शकेन, कारण संघर्ष आणि कुस्ती माझ्यामध्ये नेहमीच असेल. भविष्यात माझ्यासाठी काय असेल हे मी सांगू शकत नाही, पण मी या प्रवासाची वाट पाहत आहे. मला खात्री आहे की मी ज्या गोष्टींवर विश्वास ठेवते आणि जे योग्य आहे त्यासाठी मी नेहमीच लढत राहीन.