भुवनेश्वर : केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नी झिंगिया ओरम यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. झिंगिया ओरम यांना डेंग्यूचा त्रास होता. त्यांनी शनिवारी रात्री १०.५० वाजता अखेरचा श्वास घेतला. ५८ वर्षीय झिंगिया पती आणि दोन मुलींसोबत रहात होत्या. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम हे स्वत: डेंग्यूने त्रस्त असून, त्यांच्या पत्नीवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी जुआल ओरम यांच्या पत्नीच्या निधनावर शोक व्यक्त केला. शनिवारी रात्री त्यांनी हॉस्पिटललाही भेट दिली. सीएम माझी यांच्याव्यतिरिक्त ओडिशाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन, आरोग्य मंत्री मुकेश महालिंग, विधानसभा अध्यक्ष सुरमा पाधी आणि इतर भाजप नेत्यांनीही झिंगिया ओरम यांना श्रद्धांजली वाहिली.
सीएम माझी म्हणाले की, झिंगिया ओरम यांनी जुआल यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. जुआलने ८ मार्च १९८७ रोजी झिंगियाशी लग्न केले. कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांचे अंतिम संस्कार सुंदरगड जिल्ह्यातील त्यांच्या गावात केले जाणार आहेत.