22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरपार्सल देण्यास उशीर झाल्याने पोलिसाची डिलीव्हरी बॉयला अमानुष मारहाण

पार्सल देण्यास उशीर झाल्याने पोलिसाची डिलीव्हरी बॉयला अमानुष मारहाण

छत्रपती संभाजीनगर : पार्सल देण्यास उशीर झाल्याच्या किरकोळ कारणावरून सिडको पोलिस ठाण्याच्या मुजोर पोलिसाने डिलीव्हरी बॉयला लाठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. सोमवारी आविष्कार कॉलनीत ही घटना घडली. जीवन शेजवळ असे पोलिसाचे नाव असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जितेंद्र मानके(३०) यांची २००७ पासून वृत्तपत्राची एजन्सी आहे. कुटुंबाला आर्थिक हातभारासाठी सहा महिन्यांपासून त्यांनी ऑनलाइन पोर्टलच्या डिलीव्हरीचेही काम सुरू केले होते. सोमवारी पहाटे ४ ते ७ दरम्यान वृत्तपत्र वाटपानंतर सकाळी ११ वाजता ऑनलाइन पार्सलचे काम सुरू केले. त्यापैकी एक पार्सल शेजवळचे होते. १०:३० वाजता त्याने जितेंद्र यांना कॉल करून पार्सल लवकर देण्यास सांगितले. मात्र, पाऊस थांबताच पार्सल देतो, असे आश्वासन जितेंद्र यांनी दिले.

संपूर्ण अंगावर उमटले वळ
डिलीव्हरी करण्यासाठी एकूण ८५ पार्सल असल्याने जितेंद्र यांना वेळ लागत होता. त्या दरम्यान, शेजवळने चार कॉल केले. दुपारी २:३० वाजता आविष्कार कॉलनीत त्यांना संपर्क केला, तेव्हा शेजवळ थेट फायबरची काठी घेऊन पोहोचला. शिवीगाळ करून इतक्या उशिरा पार्सल आणतो का, असे म्हणत मारहाण सुरू केली. जीवनच्या शरीरावर त्याने सटासट लाठ्या बरसल्या. ओठ फुटून त्यांच्या संपूर्ण अंगावर रक्ताचे वळ उमटले. स्थानिकांनी धाव घेत जितेंद्र यांची सुटका केली.

‘नव्या’ पोलिसांचा उच्छांद
गेल्या काही वर्षात नव्याने दाखल झालेले तरुण पोलिस शहरात अनेक ठिकाणी दादागिरी, गुंडगिरीची भाषा वापरतात. यावर कोणाचेच नियंत्रण नाही. गस्तीवर दबंगगिरी करणे, टप-या, हॉटेल चालकांकडून बळजबरीने पाण्याच्या बाटल्या, पुड्या, खाण्याचे पार्सल घेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वाइनशॉपच्या बाहेर उभे राहून अनेक वेळा ग्राहकांना धमकावून पैसे उकळले जातात. त्यास नकार दिला की, वरिष्ठांच्या नावाने धमकावले जाते.

तत्काळ निलंबनाचे आदेश
उपायुक्त नवनीत काँवत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. गुन्हा दाखल होताच, शेजवळला निलंबित केले. त्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई होईल, असेही काँवत यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR