मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या गणेशोत्सवात ‘अदानी इलेक्ट्रिसिटी’ने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही वीजजोडणी घेण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित मंडळांना तात्पुरती वीजजोडणी मिळेल.
त्यासाठी वेबसाईटवर ‘न्यू कनेक्शन’ या विभागात तात्पुरत्या वीजजोडणीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
गेल्या वर्षी याच प्रकारे ९५८ गणेशोत्सव मंडळांना वीजपुरवठा करण्यात आला होता. या संदर्भात अडचण आली, तरी ती सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहेत.
मंडपांच्या सुरक्षिततेसाठी, तसेच गणेशोत्सव मंडपात येणा-या भक्तांच्या सुरक्षिततेसाठी उत्सव साजरा करणा-या मंडळांनी मंडपातील विजेचे वायरिंग करण्यासाठी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदारांचीच मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील गणेश विसर्जनाच्या ८० ठिकाणी फ्लड लाईट लावून तो परिसर प्रकाशमान केला जाणार आहे.