दादर : बदलापूरमध्ये अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर यावर विरोधकांनी कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. बदलापूरमधील घटना अत्यंत दुर्दैवी असून यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. ही हाक राजकीय नाही, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीला घेरले आहे.
दादरमध्ये उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्र राज्य एक कुटुंब बनून राहिले. आता मात्र सर्वांच्या मनात खंत आहे. मुलं-मुली शाळेत जात आहेत, पण शाळांमध्ये सुद्धा मुली सुरक्षित नसतील तर मग ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या वाक्याला अर्थ काय राहणार? हे बदलापूरमधील घटना समोर आली म्हणून कळत आहे. मात्र मागील अनेक महिन्यांपासून वृत्तपत्रांमध्ये अत्याचाराच्या बातम्या सतत येत आहेत. गेल्या पाच वर्षांत २० हजार मुलींवर अत्याचार झाल्याची बातमी आली आहे.
चांदवलीमध्ये देखील चिमुरडीवर अत्याचार झाला होता. मुंबईमध्ये बाल लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झाल्याची बातमी आली आहे. या असंवेदनशील घटना घडतात तेव्हा सहनशीलतेचा अंत होतो आणि जनभावनेचा उद्रेक होतो. आता तो क्षण जवळ आला आहे. विकृतांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. यामध्ये कोणताही जात, धर्म असा भेदभाव नाही, यात राजकारणही नाही. कारण शेवटी मुलगी ही मुलगी असते, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देखील विकृत मानसिकतेचे
पुढे त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, जेव्हा बहीण सुरक्षित असते तेव्हा लाडकी बहीण योजना वगैरे आणता येतात. कडेवरच्या पोरीवर असे अत्याचार होत असतील तर परिस्थिती अवघड आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडला आहे. तर त्यांना हा दुर्दैवी प्रकार मान्य आहे का? का असं झालं तरी चालतं असं त्यांचं मत आहे का? या घटनेचा निषेध एका बाजूला सुरू असताना दुस-या बाजूला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडकी बहीण योजनेचे कौतुक करत आहेत. अशा विकृत घटनेमध्ये राजकारण आणण्याचा प्रकार करणारे मुख्यमंत्री देखील विकृत मानसिकतेचे आहेत. वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागत आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.