इंदापूर : हर्षवर्धन पाटील राज्यातील फार मोठे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे अनेक वर्षाचे योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्यापुरते नाही. जरी आम्ही वेगळ््या विचाराच्या पक्षात असलो तरी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. भाजपवाले त्यांच्याबाबत अपमानास्पद बोलत असतील तर हे दुर्दैवी आहे, असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या.
भाजपला आम्ही सुसंस्कृत पक्ष समजत होतो. पुन्हा एकदा त्यांनी हे दाखवून दिले की हे नवीन भाजप आहे. ओरिजनल भाजपा कधीच अशी नव्हती. समरजित घाटगे यांचे आणि माझे अनेक वर्षांचे अतिशय चांगले संबंध आहेत. आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत, याचा आम्हाला आनंद आहे, असेही त्या म्हणाल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत त्यांनाही पक्ष सोडून जायचे असेल तर जावे, असे वक्तव्य केले. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता बावनकुळे यांनी पाटील यांच्याबाबत वक्तव्य केले.