पुणे : पुण्यातल्या मर्सिडीज बेंझ या कंपनीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) प्रदूषणा संदर्भातली नियमावली पाळत नसल्याने कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. पुण्यातील चाकण येथील मर्सिडीज असेम्बली प्लांटविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नियमित निरीक्षणादरम्यान कंपनी प्रदूषण नियमावलीच्या नियमाचे पालन करत नसल्याचे आढळून आले. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले की, त्यांनी विभागीय कार्यालयांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय त्यांनी कंपनीची २५ लाखांची बँक गॅरंटी जप्त केली.
एमपीसीबीने आपल्या प्रादेशिक अधिका-यांना परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्लांटच्या कामकाजाचा सखोल आढावा आणि आवश्यक सुधारात्मक उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.