मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरेल, असा महायुतीच्या नेत्यांना विश्वास आहे. तर, राज्य सरकारकडे निधीच नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यामध्ये आदिवासींचे बजेट ‘लाडक्या बहीण’ योजनेसाठी वर्ग केले का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
आदिवासींचे बजेट सात टक्के आहे. म्हणजे ते ७० कोटी होते. लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे आले? आदिवासींच्या बजेटचे ७ हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले का, असा सवाल आंबेडकर यांनी सरकारला विचारला आहे.
आदिवासींचे बजेट आदिवासींवर खर्च करण्याचे संविधानाचे बंधन आहे. आदिवासी बजेटमध्ये कशाकशावर खर्च केला याचे विवरणपत्र काढावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी शिंदे सरकारला केले. दहा हजार कोटी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेवले पाहिजेत. दुर्दैवाने सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जाणीव नाही, असा आरोप देखील आंबेडकर यांनी केला.