मुंबई : आज मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव जल्लोशात साजरा केला जात आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ लागली आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली असून, थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत आतापर्यंत १५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, यामुळे गोविंदाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत दादरमधील आयडियल, जांबोरी मैदान, घाटकोपर, आयसी कॉलनीसह विविध ठिकाणी मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. तर संस्कृती युवा प्रतिष्ठान, मनसेची दहीहंडी, टेंबी नाका, स्वामी प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान यांच्याही हंड्या उभारण्यात आल्या आहेत. यावेळी लाखो रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाण्यात जवळपास १ हजार ३५४ दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
या रुग्णालयांत सुरू आहेत गोविंदांवर उपचार
दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत दुपारी १२ वाजेपर्यंत विविध पथकांतील १५ गोविंदा जखमी झाले आहेत. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात १, नायर रुग्णालयात ४, सायन रुग्णालयात २, सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये १, पोद्दारमध्ये ४, राजावाडीमध्ये १, एमटी अगरवार रुग्णालयात १ आणि कुर्ला भाभा रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. यातील कोणात्याही गोविंदाला गंभीर दुखापत झाली नाही. सध्या या सर्व गोविंदांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.