24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणी‘एकमत’कडून सकारात्मकतेची पेरणी : डॉ. संजय रोडगे

‘एकमत’कडून सकारात्मकतेची पेरणी : डॉ. संजय रोडगे

‘एकमत’चा ३३ वा वर्धापनदिन स्नेहमेळावा व कृतज्ञता सन्मान सोहळा उत्साहात साजरा

परभणी : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य दैनिक एकमतने सुरू ठेवले आहे. आज वर्तमानपत्रातून नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणावर वाचायला मिळत असताना दैनिक एकमतने मात्र सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून आपले वेगळेपण जपले आहे.

याचाच एक भाग म्हणून एकमतने विविध क्षेत्रांत आपल्या कामकाजाद्वारे समाज जडणघडणीसाठी योगदान देणा-या धडपड्या लोकांचा कृतज्ञता सन्मान सोहळा वर्धापनदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केला आहे. अशी सकारात्मकता पेरणी हे अत्यंत आवश्यक आहे आणि विलासरावांचे विचार जपत एकमत ही सकारात्मकता पेरतो आहे याचे समाधान आहे. एकमतच्या या उपक्रमाचे मी मनापासून कौतुक करतो. एकमतचे समाजातील हे कौतुकास्पद कार्य या पुढेही सुरू राहील, असा विश्वास सेलूच्या श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी व्यक्त केला.

दैनिक एकमतच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात स्नेहमेळावा व कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश डोंग्रजकर होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय रोडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक व्यंकटेश कुरूंदकर, आर. पी. हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, जि. प. माजी सभापती अशोक नाना काकडे, झरीचे नवनिर्वाचित सरपंच दिलीपराव देशमुख, एनआयसीचे डॉ. सुनील पोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्ज्वलन व लोकनेते, विकासरत्न, ‘एकमत’चे संस्थापक विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. पुढे बोलता डॉ. रोडगे म्हणाले की, हल्ली समाज माध्यम ही समाजात अशांतता निर्माण करणारी मोठी बाब ठरली आहे. अशा वेळी प्रिंट मीडिया आपली विश्वासार्हता जपून समाजात सकारात्मकता पेरतो आहे याचे आम्हा एकमतच्या वाचकांना समाधान आहे. विलासराव देशमुख हे राजकारणातील एक राजहंस होते. पूर्ण देशात मला ज्योतिरादित्य शिंदे आणि विलासराव देशमुख या दोन नेत्यांचे व्यक्तिमत्त्व आवडते. त्यांच्या अकाली जाण्याने मराठवाड्याची फार मोठी हानी झाली आहे. ही पोकळी अद्यापही भरून निघू शकत नाही. विलासरावांनी समाजकारणाचा एक पॅटर्न निर्माण केला होता. त्याच पॅटर्नचे अनुकरण एकमत वृत्तपत्राद्वारे होत आहे.

या वेळी झालेल्या कृतज्ञता सन्मान सोहळ्यास परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत २८ सन्मानार्थींचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. या वर्धापनदिन स्नेहमेळावा व कृतज्ञता सन्मान सोहळ्याला परभणी व हिंगोली शहर व जिल्ह्यातील एकमतचे वाचक, जाहीरातदार, विक्रेते बंधू, हितचिंतक, मार्गदर्शक, मान्यवर मंडळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या या लक्षणीय उपस्थितीने एकमतचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR