नाशिक : जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथे आज दूध उत्पादक शेतक-यांनी आंदोलन केले. आंदोलकांनी बाणगंगा नदीत शेकडो लिटर दूध टाकत सरकारचा निषेध केला आहे. सरकारने गायीच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये लिटर भाव जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी आज सकाळच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या मौजे सुकेणे व कसबे सुकेणे येथील दूध उत्पादक शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन करत बाणगंगेत शेकडो लिटर दूध ओतून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला.
शेतीचा दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते, मात्र पशुधन चारा व खाद्य यांचे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाव वाढत असून सद्यस्थितीत दूध संकलन केंद्रांकडून मिळणारा दुधाला भाव आणि दूध उत्पादन करताना होणारा खर्च याचे गणित हे शेतक-यांना आर्थिक तोट्याचे निघत आहे. त्यामुळे पशुधन सांभाळायचे कसे? दुग्ध व्यवसाय कसा करायचा, या संकटात सध्या ग्रामीण भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी सापडले आहेत. तालुक्यातील मौजे सुकेणे, कसबे सुकेणे, ओणे, थेरगाव, वडाळी, शिरसगाव या शिवारातील सर्व दुग्ध उत्पादक शेतक-यांनी आज कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथील बाणगंगा नदीवरील पुलावर आंदोलन केले.
दरम्यान, गायीच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८० रुपये असा भाव राज्य शासनाने जाहीर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दूध उत्पादक शेतक-यांनी दूध नदीपात्रात टाकले. यंदा नाशिक जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ निर्माण झाला असून पशुधनाला चारा कसा पुरवायचा हा प्रश्न देखील सध्या शेतक-यांसमोर आहे..
सरकी ढेप ५० किलोला १६०० ते १७०० रुपये, कांडी खाद्य, ऊस कांडी चार हजार रुपये असे खाद्याचे भाव वाढलेले आहेत. ज्यादा भावाने चारा आणि पशुखाद्याची खरेदी शेतक-यांना करावी लागत आहे. सध्या दुधाला २० ते २४ रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतीचा दुय्यम धंदा म्हणून बेरोजगार असलेले शेतकरी युवक दूध व्यवसाय करतात, मात्र दुधाला भाव नसल्याने येथेही शेतक-यांची आर्थिक कोंडी झाली असून शेतकरी शेती आणि दुग्ध व्यवसायातही कर्जबाजारी होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी शेतक-यांनी व्यक्त केली.