लातूर : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची गावपातळीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने लातूर जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. तशा सुचना मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी होणा-या विशेष ग्रामसभेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या वर्षी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून माहिती देऊन या योजनाचा लाभ त्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.
सदर ग्रामसभेस तालुका स्तरावरुन समन्वय अधिकारी तथा निरीक्षक म्हणून उपस्थित राहतील, असे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हा परिषद लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीच्या पूर्वी राज्य शासनाने विविध योजनांचा धडका सुरू केला आहे. मात्र या योजना तळागळात जाण्यासाठी, त्याचा लाभ नागरीकांना व्हावा, योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात या उद्देशाने आज विशेष ग्रामसभा जिल्हयातील ७८६ ग्रामपंचायतीमध्ये होणार आहेत.
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेची गावपातळीवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष ग्रामसभेचे आयोजन जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये करणेबाबत संदर्भ ७ अन्वये सूचित केलेले आहे. त्याअनुषंगाने, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ७ (२) मधील तरतुदीनुसार तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये शुक्रवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे, अशा सुचना गटविकास अधिकारी यांना केल्या आहेत.