न्यूयॉर्क : भारताच्या रोहन बोपण्णाने आपला ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन याच्यासोबत शानदार खेळ करत यूएस ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. त्यांनी नेदरलँडच्या सँडर एरेंड्स आणि रॉबिन हास यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. हा सामना रात्री ६४ मिनिटे चालला. बोपण्णा आणि एबडेन जोडीने पहिल्या फेरीचा सामना ६-३, ७-५ असा जिंकला. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या जोडीने शेवटचे तीन सामने गमावल्यानंतर यूएस ओपनमध्ये प्रवेश केला होता पण त्यांनी येथे चांगली कामगिरी केली.
बोपण्णा आणि एबडेन यांनी सुरुवातीला संघर्ष केला आणि तिस-या गेममध्ये सर्व्हिस गमावली. मात्र, त्यांनी लवकरच पुनरागमन करत डच जोडीला दोनदा मोडून काढले आणि सलग चार गेम जिंकले. दुस-या सेटमध्येही त्याला अशाच आव्हानाचा सामना करावा लागला. बोपण्णा आणि एबडेन सुरुवातीला पिछाडीवर होते पण त्यांनी ५-५ अशी बरोबरी साधली. यानंतर पुन्हा एकदा नेदरलँडच्या जोडीची सर्व्हिस भेदून सामना जिंकला. विद्यमान ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन आणि द्वितीय मानांकित बोपण्णा आणि एबडेन यांचा दुस-या फेरीत स्पेनचा रॉबर्टो काबार्लेस बायना आणि अर्जेंटिनाचा फेडेरिको कोरिया या बिगरमानांकित जोडीशी सामना होईल.
दरम्यान, जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू यानिक सिनर आणि इगा स्विटेक यांनी सोपा विजय मिळवून यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला, मात्र माजी विजेत्या नाओमी ओसाका आणि कार्लोस अल्काराझ यांना नमते घ्यावे लागले. पाचव्या मानांकित आणि २०२१ चा चॅम्पियन डॅनिल मेदवेदेव आणि १० व्या मानांकित अॅलेक्स डी मिनौर यांनीही तिस-या फेरीत प्रवेश केला. मिनौरचा पुढील सामना डॅन इव्हान्सशी होईल.