नवी दिल्ली : चीनमध्ये न्यूमोनियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतानाच केंद्रातील मोदी सरकारने राज्यांना रुग्णालयांच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनमधील या रहस्यमय आजाराच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने श्वसनाशी संबंधित आजारांच्या तयारीसंदर्भात सक्रिय आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाच्या तयारीसंदर्भात तत्काळ आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
याच बरोबर, उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाचे आजार आणि ‘एच ९ एन २’ संसर्गाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच, चीनमध्ये आढळलेल्या एव्हीयन इन्फ्लूएंझा (एच ९ एन २) आणि श्वसन रोगांचा धोका भारताला कमी आहे. चीनमधील इन्फ्लूएंझा परिस्थितीमुळे उद्भवू शकणा-या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत तयार आहे. उत्तर चीनमधील मुलांमध्ये श्वसनाच्या आजाराची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर नोंदवली गेली आहेत.
केंद्राचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, कोरोना संदर्भातील दक्षतेच्या धोरणांची सुधारित ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे लागू करतील. श्वसनाशी संबंधी आजारांची वाढ प्रामुख्याने इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, सार्स-कोव्ह-२ सारख्या सर्वसामान्य कारणांमुळे होते. आरोग्य मंत्रायलाचे परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. तसेच, याला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
संक्रमण पसरण्याचा धोका कमी
डब्ल्यूएचओने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात या संसर्गाचा मानव ते मानव प्रसार होण्याची शक्यता कमी आहे आणि आतापर्यंत आढळलेल्या ‘एच ९ एन २’ प्रकरणांमध्ये मृत्यूदर कमी आहे असेही मंत्रालयाने म्हटले आहे.