33.6 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeराष्ट्रीयरुग्णालये कॉर्पोरेट मशीनप्रमाणे काम करतायेत

रुग्णालये कॉर्पोरेट मशीनप्रमाणे काम करतायेत

वायनाड : देशातील राज्यस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोरामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका पाहता आज मतदान प्रक्रिया संपणार आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरूवार दि. ३० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आपल्या लोकसभा मतदारसंघ वायनाडमध्ये पोहोचले आहेत. याठिकाणी राहुल गांधी यांनी नवीन ब्लॉक (इकरा डायग्नोस्टिक्स, ऑक्सिजन प्लांट) इक्रा रुग्णालयाच्या उद्घाटन समारंभात भाग घेतला. यावेळी आपल्या देशातील अनेक रुग्णालये पूर्णपणे कॉर्पोरेट मशीन म्हणून काम करत आहेत. हा चांगला ट्रेंड नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. राष्ट्रीय स्तरावर आरोग्य सेवेबाबत वेगळा विचार करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने गरीब लोकांना अत्यंत कमी खर्चात आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. आम्ही राजस्थानमध्ये या दिशेने काम केले आहे. 2024 मध्ये आम्ही सत्तेत आलो तर देशभरात असे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करू, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

मोदींवर हल्लाबोल
राहुल गांधी सध्या केरळ दौ-यावर आहेत. याआधी मंगळवारी नामपल्ली येथे राहुल गांधी म्हणाले होते की, देशातून द्वेष दूर करणे हे माझे ध्येय आहे. द्वेष संपवण्यासाठी केंद्रात नरेंद्र मोदींचा पराभव करणे आवश्यक आहे. तसेच, नामपल्ली येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केले. कट्टरवाद्यांनी संपूर्ण देशात द्वेष पसरवला आहे असे राहुल गांधी म्हणाले.

२४ गुन्हे दाखल
भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत यात्रेदरम्यान मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याचे वचन दिले होते, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच, पंतप्रधानांविरुद्ध लढत असल्यामुळे आपल्यावर २४ गुन्हे दाखल झाल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. माझे सरकारी घर हिसकावण्यात आले. मात्र, मी म्हणालो की मला हे नको आहे, देशातील करोडो गरीब जनतेच्या हृदयात माझे घर आहे असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR