16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयआंदोलनादरम्यान डॉक्टरांनी सुरू केले अभया क्लिनिक

आंदोलनादरम्यान डॉक्टरांनी सुरू केले अभया क्लिनिक

रुग्णांवर मोफत उपचार कोलकाता प्रकरण

कोलकाता : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ट्रेनी डॉक्टरसोबत घडलेल्या भयंकर घटनेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान कोलकाताच्या ज्युनिअर डॉक्टरांनी रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी टेलिमेडिसिन सर्व्हिस सुरू केली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आजपासून आंदोलक डॉक्टरांनी शहरातील विविध भागात तात्पुरते हेल्थ कॅम्प सुरू करून रुग्णांची मदत घेतली. ज्युनिअर डॉक्टर सर्वसामान्यांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत.

पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्युनिअर डॉक्टरांकडून मोफत उपचार करून त्यांचा आवाज सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जात आहे. पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर फ्रंटने कोलकाता येथे सहा ठिकाणी तात्पुरते हेल्थ कॅम्प सुरू केले आहेत, जिथे कोलकाता मेडिकल कॉलेज, आरजी कर मेडिकल कॉलेज, नॅशनल मेडिकल कॉलेज यासह अनेक वैद्यकीय महाविद्यालयातील ज्युनिअर डॉक्टर रुग्णांना तपासत आहेत. या हेल्थ कॅम्पला डॉक्टरांनी अभया क्लिनिक असे नाव दिले आहे.

पश्चिम बंगाल ज्युनियर डॉक्टर फ्रंटने सांगितले की, दर रविवारी कुमारटुली, एस्प्लेनेड क्रॉसिंग, रानुचाय मंच, नॅशनल मेडिकल गेट नंबर २, एनआरएस मेडिकलच्या गेट नंबर १ येथे कॅम्प आयोजित केले जातील. जोका ईएसआय हॉस्पिटलचे ज्युनिअर डॉक्टर बेहाला येथे हेल्थ कॅम्पच आयोजन करतील. हेल्थ कॅम्प सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहेत. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ‘आरजी कर पीडितेला न्याय हवा आहे असे लिहिले आहे.

आरजी करच्या पीडितेची ओळख उघड होऊ नये म्हणून मीडिया आणि डॉक्टरांनी तिचे नाव ‘अभया’ असे ठेवले आहे. ज्युनियर डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांनी आरोग्य शिबिराच्या पहिल्या दिवशी टेलिमेडिसिन सर्व्हिसद्वारे सुमारे ५०० रुग्णांना अटेंड केले आहे. टेलीमेडिसिन सर्व्हिससाठी चार नवीन सिमकार्डची नोंदणी करण्यात आली असून ते क्रमांक सर्वांसोबत शेअर करण्यात आले आहेत. आंदोलक डॉक्टर म्हणाले, आंदोलनापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा सुरूच ठेवू. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आगामी काळात आम्ही असेच काम करत राहू.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR