ताडकळस/प्रतिनिधी
पुर्णा तालुक्यातील खडाळा येथे २५ वर्षीय विवाहित महिलेने खदानीतील पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ३१ आगस्ट रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.या घटनेची माहिती मिळताच ताडकळसचे ठाणेदार गजानन मोरे, दिपक बेंडे, मारोती कुडगीर,संदीप सावळे यांनी घटनास्थळी जाऊन मयत महिलेचा पंचनामा करून ताडकळस पोलीस ठाण्यात पत्तीसह ५ आरोपीवर गुन्हा दाखल करुन आरोपी अटक करण्यात आले आहेत.
मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ताडकळस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.शवविच्छेदन डॉ.वैभव कांबळे यांनी केले.
खडाळा येथील मयत महिला मनुषा हिचा विवाह सन २०२० मध्ये खडाळा येथील कृष्णा मुधोळकर याच्याशी झाला होता. त्या संसारात दोन मुली झाल्या, एक ३ वर्षाची व दुसरी ६ महीन्याची आहे. सासरच्या मंडळींच्या सततच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद भाउसाहेब बापुराव चमकुरे (रा. लहुजी नगर गंगाखेड, ता. गंगाखेड जि. परभणी) यांनी पोलिस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा मशन्ना मुधोळकर(पती), मशन्ना किशन मुधोळकर (सासरा), चिमुताई मशन्ना मुधोळकर(सासू), पूजा सिद्धू कुसले, (नणंद), सपना मशन्ना मुधोळकर (नणंद), गोपी मशन्ना मुधोळकर (दीर सर्व रा. खडाळा ता. पूर्णा जि. परभणी) यांनी मयत मनुशाला त्रास दिला.
मनुषा कृष्णा मुधोळकर, (वय- २५ वर्षे रा.खडाळा) आरोपीतांनी संगणमत करुन दोन्ही मुलीच झाल्यात, तुला मुलगा होत नाही असे म्हणुन व ट्रॅक्टरचे पैसे फेडण्यासाठी माहेरहून आणखी एक लाख रुपये घेउन ये असे म्हणुन वेळोवेळी तिला उपाशी ठेउन शिवीगाळ करुन मारहाण करुन मानसिक व शारिरीक त्रास दिला. त्या त्रासाला कंटाळुन तिने खडाळा येथील गणेश सोळंके यांच्या खदानीतील पाण्यामध्ये उडी मारुन जिव दिला. व तिच्या मरणास सर्व आरोपी हे कारणीभुत झाले आहेत म्हणुन ताडकळस पोलीस ठाण्यात सहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे हे करीत आहेत.