पूर्णा : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तालुक्यातील पिंपळगाव बाळापूर येथे पूर्णा नदीला मोठा पूर आल्याने नदीपात्रातील एका झाडावर मागील दोन दिवसांपासून ३० वानरे अडकली होती. या वानरांना पुराच्या पाण्यातून जात केळी देण्यात आली तसेच प्रशासनाने रेस्क्यू करीत या वानरांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आले आहे.
पिंपळगाव बाळापूर येथे पूर्णा नदीच्या पात्रातील पाण्यात एका झाडावर ही वानरे अडकली होती. दोन दिवसांपासून खाण्यासाठी काहीच न मिळाल्याने भुकेपायी या वानरांचा जीव कासावीस झाला होता. याची माहिती मिळताच पिंपळगाव बाळापूर येथील युवासेना प्रमुखआप्पा बनसोडे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर वानरांना नदीपात्रातून पोहत जात खाण्यासाठी केळी दिली. याप्रसंगी नारायण बनसोडे, प्रल्हाद बनसोडे, अंगद बनसोडे, गोविंद बनसोडे, लक्ष्मन बनसोडे तुकाराम बनसोडे, तलाठी काटकर, मंडळ अधिकारी सुदाम खुणे, राधेश्याम बनसोडे, वनविभागाचे कर्मचारी यांनी वानरांना केळी देण्यासाठी परिश्रम घेतले. त्यानंतर प्रशासनाने रेस्क्यू करत वानरांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.