पोल्टावा : वृत्तसंस्था
रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. रशियाने मंगळवारी युक्रेनवर बॅलेस्टिक मिसाईल हल्ला केला. दोन रशियन क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील पोल्टावा शहराला लक्ष्य केले. या हल्ल्यात ४१ लोकांचा मृत्यू झाला असून १८० जण जखमी झाले आहेत. रशियन क्षेपणास्त्रांनी लष्करी शैक्षणिक संस्थेला लक्ष्य केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली.
झेलेन्स्की यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, मला पोल्टावामध्ये झालेल्या रशियन हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भागात दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यांनी एका शैक्षणिक संस्थेला आणि जवळच्या हॉस्पिटलला लक्ष्य केले आहे. टेलिकम्युनिकेशन इन्स्टिट्यूटची इमारत देखील अंशत: नष्ट झाली आहे.
झेलेन्स्की यांनी असेही सांगितले की, लोक ढिगा-याखाली अडकले होते. त्यापैकी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे, परंतु १८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुर्दैवाने, यात अनेकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ४१ लोक या मृत्युमुखी पडले आहेत. त्या सर्वांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. माझ्या सहवेदना त्यांच्या नातेवाईकांसोबत आणि प्रियजनांसोबत आहेत.
देशाच्या मध्य भागात रशियाने हा हल्ला केला आहे. युक्रेनवरील क्षेपणास्त्र हल्ल्याच्या दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन मंगळवारी मंगोलियात आले होते. तेथे खरे पाहता त्यांच्या अटकेसाठी आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी असतानाही त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या आक्रमणादरम्यान केलेल्या कथित युद्ध गुन्ह्यांमुळे पुतिन यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय वॉरंट जारी करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने सुमारे १८ महिन्यांपूर्वी अटक वॉरंट जारी केले होते. तरीही आज त्यांचे स्वागत झाल्याने जागतिक स्तरावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.