मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना, राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. आगामी लोकसभेसाठी जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी २२ जागा लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मौन बाळगले आहे. त्यामुळे हा फॉर्म्युला मित्र पक्षांना मान्य होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी लोकसभेसाठी महायुतीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले आहे. प्रस्तावित जागांवर चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे. महायुतीच्या जागा वाटपावर लवकरच चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण झाले असून मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला मतदारांची पसंती आहे, याचे कल हाती आले आहेत.आमच्याकडे विजयी होणा-या उमेदवारांची माहिती प्राप्त झाली आहे. २०१९ साली निवडून आलेल्या खासदारांना पुन्हा उमेदवारी देणे ही परंपरा आहे. पण हा अंतिम शब्द नाही. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध स्तरांवर चर्चा केली जाईल, असे फडणवीस म्हणाले. अधिवेशनानंतर भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. राज्यातील जनता मोदींच्या पाठीशी आहे. त्यामुळे महायुतीचा ४० ते ४२ जागांवर विजय निश्चित आहे, असेही त्यांनी सांगितले.
हिवाळी अधिवेशनानंतर प्रचाराचा नारळ फुटणार
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ हिवाळी अधिवेशनानंतर फुटणार आहे. नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होणार आहे.
अजित पवारांचे नो कॉमेंटस
उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौ-यावर होते. त्यांना महायुतीतील फॉर्म्यूल्याबाबत विचाले असता मी यासंबंधी काहीही स्टेटमेंट करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. त्यांनी नो कॉमेंटस् असे म्हटल्याने जागा वाटपावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे.