नवी दिल्ली : वृत्तसंस्था
हवामान खात्याने शुक्रवारी (६ सप्टेंबर) १८ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमधील चमोली येथील बद्रीनाथ महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली. डोंगराचा अर्धा भाग तुटून रस्त्यावर पडला. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
राजस्थानमध्ये पावसाचा १३ वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. या पावसाळी हंगामात १ जून ते ५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६०७.५ मिमी पाऊस पडला आहे, तर संपूर्ण हंगामात ४३५.६ मिमी पाऊस झाला आहे. २०११ ते २०२३ पर्यंत कधीही ६०० मिमी पाऊस पडला नाही.
राजस्थानातील अनेक धरणे ओसंडून वाहत आहेत. बिसलपूर धरणाचे दरवाजे आज उघडले जाणार आहेत. २००४ पासून, बिसलपूर धरणाचे दरवाजे फक्त ६ वेळा उघडण्यात आले आहेत.
मध्य प्रदेशात १ जून ते ५ सप्टेंबरपर्यंत ९०४.९ मिमी पाऊस झाला. वार्षिक मान्सूनच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण १०% जास्त आहे. या कालावधीत राज्यात साधारणपणे ८२३.९ मिमी पाऊस पडतो.
आंध्र प्रदेशातील पुरामुळे ६ लाख लोकांनी घरे सोडली. आंध्र प्रदेशात अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचले आहे. विजयवाडामध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. राज्यात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला.
मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने पूर्व राजस्थान, ओडिशा, आसाम, मेघालयमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, किनारी कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊ शकतो.