पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची विक्रमी कामगिरी सुरू आहे. शनिवारी भारताला पुरुषांच्या भालाफेकीच्या एफ ४१ गटात नवदीप सिंगने आणखी रौप्यपदक जिंकून दिले. त्यापाठोपाठ सिमरन शर्माने महिलांच्या २०० मीटर टी१२ गटाच्या अंतिम फेरीत कांस्यपदकाची कमाई केली. त्यामुळे भारताच्या पदकांची संख्या २९ झाली आहे. भारताने ६ सुवर्ण, १० रौप्य आणि १३ कांस्यसह एकूण २९ पदके जिंकली आहेत. सध्या भारत पदकतालिकेत १८ व्या क्रमांकावर आहे.
नवदीपने तिस-या प्रयत्नात ४७.३२ मीटरसह पॅरालिम्पिक विक्रमाची नोंद केली. चीनच्या सून पेंगिझिआंगचा २०२१मध्ये टोकियोतील ४७.१३ मीटरचा पॅरालिम्पिक विक्रम आज मोडला. पण, इराणच्या सयाह सहेघ बेतने त्याच्या पाचव्या प्रयत्नात ४७.६४ मीटर भालाफेकून भारतीय खेळाडूचा पॅरालिम्पिक विक्रम मोडला आणि अव्वल स्थान काबीज केले. नवदीपला रौप्यपदक मिळाले, तर चिनी खेळाडूला कांस्यपदक मिळाले.
सिमरन शर्मा ही दृष्टिहीन पॅरा-अॅथलीट आहे आणि तिने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये दुहेरी रौप्यपदक जिंकले आहे. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी तिने तिचे प्रशिक्षक नाईक गजेंद्र सिंह यांच्याशी लग्न केले. ते आर्मी सर्व्हिस कॉर्प्सच्या नवी दिल्लीतील २२७ कंपनीत तैनात आहेत. सिमरने २०२१ मध्ये दुबई येथे चायना ग्रांप्री आणि वर्ल्ड पॅरा ग्रँड प्रिक्समध्ये भाग घेतला. २०२१ मध्ये टोकियो पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय पॅरा अॅथलीट ठरली होती, परंतु तिला पदक जिंकता आले नव्हते. मात्र आज तिने महिलांच्या २०० मीटर टी १२ अंतिम फेरीत २४.७५ सेकंद या तिच्या सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह कांस्यपदक पक्के केले. क्युबाच्या ओमारा ड्युरँड २३.६२ सेकंद आणि व्हेनेझ्युएलाच्या पाओलो लोपेझने २४.१९ सेकंदाच्या वेळेसह अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.