मुंबई : झटपट पैशांसाठी सुमारे सतरा लाखांचा जेसीबी पळविर्णाया तिघांना आंबोली पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रशीद शेख, तबरेज शेख आणि शफी शेख अशी या तिघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या तिघांकडून चोरी केलेला जेसीबी जप्त केला आहे. किशोर नामदेव राठोड हे गोरेगाव येथील शास्त्रीनगर परिसरात राहतात. ते एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांचा कंपनीचा सतरा लाखांचा एक जेसीबी त्यांनी अंधेरीतील न्यू लिंक रोड, गौरव हाईटससमोरल मेट्रो स्टेशनजवळ पार्क केला होता. हा जेसीबी ११ सप्टेंबरला अज्ञात चोरट्याने पळवून नेला होता.
हा प्रकार दुर्सया दिवशी उघडकीस येताच त्यांनी आंबोली पोलिसांत जेसीबी चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून एपीआय हरी बिरादार व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मोहम्मद रशीदला ताब्यात घेतले होते.