23 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरगणपती बाप्पा स्वत: पिंपळ वृक्ष लावतात 

गणपती बाप्पा स्वत: पिंपळ वृक्ष लावतात 

लातूर : प्रतिनिधी
मी दगडात नाही, मी देवळात नाही तर मी झाडात आहे,  ही टॅग लाईन घेऊन २०१६-१७ या वर्षांपासून लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने लातुरात चक्क झाडाचा गणपती विराजमान केला जातो. शहरातील राजीव गांधी चौक परिसरात मुख्य रस्त्यावर हा आगळा वेगळा गणेशोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदा झाडातून गणराय साकारले असून, स्वत: गणपती बाप्पा एक वृक्ष लावून वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची गरज आहे असा संदेश देतो आहे.
लातूर येथील वसुंधरा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी राजीव गांधी चौकात झाडाचा गणपती साकारला जातो. दरवर्षी एक वेगळा देखावा सादर करीत वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षीही एका झाडातून गणराय साकारले असून, हे गणराय स्वत: एक पिंपळ वृक्ष लावत असल्याचे हुबेहूब सादरीकरण करण्यात आले आहे. हा आगळा वेगळा गणेशोत्सव सर्वांचे आकर्षण करीत असून, दररोज हजारो लोक या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. ऑक्सिजनचे महत्व लक्षात यावे यासाठी या गणेशोत्सव मंडपात पुतळ्यांना ऑक्सिजन मास्क लावून भविष्यात ही परिस्थिती माणसांवर येऊ नये यासाठी वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले जाते आहे. या गणेशोत्सवाच्या  यशस्वीतेसाठी वसुंधरा टीम परिश्रम घेत आहे.
गणेशोत्सव ठिकाणी पूर्णपणे जंगल थीम उभारण्यात आली आहे. प्रवेश करताना उड्डाण पुलावर जाऊन पूर्ण उड्डाण पूल पार करून गणपती बाप्पाचे दर्शन करता येते. उड्डाण पुलाखाली कृत्रिम तळे उभारून त्यात जिवंत मासे सोडण्यात आले आहेत. गणेश मंडपात डोंगर उभारण्यात आला आहे. शिवाय, या ठिकाणी पाठीवरती कृत्रिम ऑक्सिजन आणि मास्क लावलेले माणसांचे पुतळे बांधले असून या माध्यमातून झाडांचे महत्त्व रुजविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एकदरित दरवर्षी वसुंधरा प्रतिष्ठान पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करुन सा-याचे लक्ष वेधून घेते.
वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना फळाचे रोप आणि कापडी पिशवी बाप्पाचा प्रसाद म्हणून दिला जातो. दिलेले फळाचे रोप भक्तांनी आपल्या घरी अथवा उपलब्ध जागेत लावून त्याचे संवर्धन बाप्पाच्या नावाने करण्याची विनंती केली जाते. शिवाय, लातूर शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील इतर सार्वजनिक गणेश मंडळांना सोबत घेऊन एक गणेश मंडळ:५१ वृक्ष हा उपक्रम देखील राबविला जातो. या माध्यमातून वृक्ष चळवळ ही सर्वसमावेशक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR