ठाणे : प्रतिनिधी
येथील घोडबंदर रोडवर दिवसेंदिवस अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकल्याची घटना घडली.
या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी रुग्णांवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठाण्याच्या घोडबंदर रोडवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक दिली. या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर बसचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी रात्री हा अपघात झाला आहे.
एसटी बसने पिलरला धडक दिल्याने बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेतील जखमींवर ऑस्कर आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल, वाहतूक पोलिस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बस बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. तर या अपघाताने घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.