तेलअवीव : इस्रायल-हमास युद्धाचा आज २३ वा दिवस आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने गाझामध्ये प्रवेश केल्याचे म्हटले आहे. तो येथे जमिनीवर हल्ले करत आहे. आयडीएफने रात्री उशिरा गाझामध्ये जमिनीवर हल्ले केले. या हल्ल्याचा व्हीडीओही जारी केला.
आयडीएफने सांगितले की ते हमासच्या दहशतवाद्यांचे लोकेशन ट्रेस करून त्यांचे लपलेले ठिकाण नष्ट करत आहेत. इस्रायली लष्कराने गाझाला युद्धक्षेत्र घोषित केले असून लोकांना गाझा सोडण्यास सांगितले आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ११.०० वाजता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हमासविरुद्धचे युद्ध दुस-या टप्प्यात पोहोचले आहे. नेतन्याहू पुढे म्हणाले की हे एक दीर्घ युद्ध असेल. आम्ही लढू, आम्ही जिंकू. आम्ही शरणागती पत्करणार नाही आणि मागे हटणार नाही. नेतन्याहू यांनी याला इस्रायलचे दुसरे स्वातंत्र्य युद्ध म्हटले आहे.
टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ओलीसांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. हमासच्या कैदेत २२९ ओलिस आहेत. त्यांचे कुटुंबीय अनेक दिवसांपासून पंतप्रधान नेतन्याहू यांना भेटण्याची मागणी करत होते. ओलिसांच्या सुरक्षेची सर्वांनाच चिंता होती. ते म्हणाले की, लष्कर हमासच्या भूमिगत तळांना लक्ष्य करत आहे. बोगद्यांमध्ये ओलीस ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.
गाझा भागातील संपर्क तुटला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युद्धावर चर्चा केली. भारत-इजिप्त संबंध दृढ करण्यावरही त्यांनी चर्चा केली. २७ ऑक्टोबर रोजी उशिरा झालेल्या इस्रायली बॉम्बस्फोटामुळे गाझा भागातील दळणवळण विस्कळीत झाले, त्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आले. जवळपास २३ लाख लोक जगापासून तुटले आहेत.