जालना : ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण हवे, यासाठी राज्यात संघर्ष सुरू आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष उभारणारे मंत्री छगन भुजबळांनंतर लक्ष्मण हाके यात आघाडीवर आहेत. अशातच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगेंची मध्यरात्रीनंतर घेतलेल्या भेटीवर लक्ष्मण हाके संतापले आहेत.
मनोज जरांगेंना लोक रात्रीच का भेटतात याबाबत जाहीर खुलासा त्यांनी केलाच पाहिजे. ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही संघर्ष उभा केल्याने या भेटीचे कारण आम्हाला समजलेच पाहिजे, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी या भेटीला फटकारले आहे.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी येथं मनोज जरांगे यांची मध्यरात्रीनंतर भेट घेतली. आता या भेटीवर ओबीसी आरक्षणासाठी राज्यभर संघर्ष करणारे लक्ष्मण हाके संतापले आहेत. हाके म्हणाले, मनोज जरांगे यांना लोक रात्रीचे का भेटतात? ही भेट कशासाठी होती, हे आता त्यांनी जाहीररीत्या सांगितले पाहिजे. कारण आम्हाला समजले पाहिजे. तुम्ही संविधानाची शपथ घेतली. जरांगेकडे तुम्हाला का जावे लागले, कोण आहेत जरांगे? जो व्यक्ती, माणूस संविधानाच्या विरोधात आहे, ओबीसींची घरे जाळण्यासाठी सांगतो, ओबीसींना मतदान नाही करायचे म्हणतो, त्यांची भेट कशाला?