राष्ट्रवादीच्या आमदारांच्या जागांवर भाजपचा दावा
मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या महायुतीत ४० जागांवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. या जागांची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये भाजपचे इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांनी शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर विधानसभेची तयारी सुरु केली. पण आधी एकनाथ शिंदे आणि मग अजित पवार भाजपसोबत आल्याने अनेकांची अडचण झाली आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच मुंबई दौ-यावर येऊन गेले. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशी चर्चा केली. स्थानिक पातळीवर वाद सोडवा आणि जागावाटप निश्चित करा. लवकरात लवकर बैठका घेऊन तोडगा काढा. त्यानंतर १० दिवसांत दिल्लीत बैठक घेऊन जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय होईल, अशा सूचना शहांनी दिल्या. स्थानिक पातळीवर प्रश्न न सुटलेल्या जागांचा निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे, असेही सांगण्यात आले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी थेट लढत झाली. शिवसेनेने १२४ जागा लढवत ५६ जागा जिंकल्या तर भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागांवर बाजी मारली तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागांवर विजय मिळवला. सध्या अजित पवारांसोबत असलेले ४० आमदार शिवसेना, भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून जिंकले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीत गोची झाली आहे.
भाजप, शिंदे सेनेची गोची
सिटिंग-गेटिंगच्या फॉर्म्युलानुसार जागावाटप झाल्यास ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला संबंधित जागा सुटेल. पण २०१९ मध्ये युती तुटल्यानंतर भाजपचे पराभूत झालेले उमेदवार पुढील निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले नेते सक्रिय झाले. पण अजित पवारांची महायुतीत एन्ट्री झाल्याने ४० जागांवर भाजप, शिंदेसेनेची गोची झाली आहे. यातील २८ जागांवर अजित पवारांचे आमदारविरुद्ध भाजपचे इच्छुक असा संघर्ष आहे तर अन्य जागांवर अजित पवारांचे आमदारविरुद्ध शिंदेसेनेचे इच्छुक अशी रस्सीखेच आहे.