नागपूर : रामदासपेठ परिसरात तीन वाहनांना धडक दिलेल्या ऑडी मोटारीचा चालक अर्जुन हावरे आणि रोनित अजय चित्तमवार यांच्या शरीरातील रक्तात मद्याचे अंश असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. त्यामुळे मद्याच्या नशेत असलेल्या मित्रांना मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी ऑडी कारचा मालक संकेत चंद्रशेखर बावनकुळे याच्यावर सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रामदासपेठ परिसरात रविवारी (ता. ९) मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या आलिशान ऑडी गाडीने दोन मोटारी व एका दुचाकीला धडक दिली. या घटनेनंतर पोलिसांनी ऑडी ताब्यात घेऊन अर्जुन आणि रोनित यांच्यावर गुन्हा दाखल केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या मालकीची ही मोटार असल्याचे तपासात आढळले. सीताबर्डी पोलिसांनी अर्जुन आणि रोनित यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय केली. त्यांच्या रक्तात मद्याचे २५ ते २८ टक्के प्रमाण आढळून आले.
विशेष म्हणजे, सात तासानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीनंतर हे प्रमाण आढळून आले. त्यामुळे मद्य प्यायले असताना संकेतने त्यांना मोटार चालविण्यास दिली. त्यामुळे या प्रकरणात संकेतवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
१६० सीसीटीव्हीची तपासणी
ऑडी मोटारीने धडक देण्यापूर्वी ती नेमकी कुठेकुठे धडकली हे तपासण्यासाठी पोलिसांनी शहरातील १६० ठिकाणच्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यात संकेत मोटारीच्या रुफटॉपवर बसलेला आढळून आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.