हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी २.५ लाखांहून अधिक कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर तैनात असतील असे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी माध्यमांना सांगितले आहे. विकास राज यांनी सांगितले की, जारी करण्यात आलेल्या १,६८,६१२ पोस्टल बॅलेटपैकी २६ नोव्हेंबरपर्यंत ९६,५२६ मतदान झाले आहे. तसेच ४५ हजार तेलंगणा पोलिस कर्मचारी निवडणूक ड्युटीवर तैनात असतील. शेजारील राज्यांमधून एकूण २३,५०० होमगार्ड जवानांची मागणी करण्यात आली होती, ते मंगळवारी येथे पोहचतील असे त्यांनी सांगितले.
विकास राज म्हणाले की, राज्य विशेष पोलिसांच्या ५० कंपन्या आणि केंद्रीय दलाच्या ३७५ कंपन्या मतदानादरम्यान सुरक्षा व्यवस्था सांभाळणार आहेत. ‘होम व्होटिंग’ सुविधेद्वारे २६,६६० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे त्यांनी सांगितले. ९ ऑक्टोबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींनी तेलंगणामध्ये ७०९ कोटी रुपयांहून अधिक किमतीची गुन्हेगारी सामग्री जप्त केली आहे, ज्यात सोने, दारू, रोख आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.