नागपूर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत विदर्भातील ६२ जागांपैकी २९ जागांचे जागावाटप ठरल्याचे समोर येत आहे.
विदर्भातील विधानसभेच्या ६२ जागांपैकी २९ जागांवर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा कोणताच वाद नसल्याची माहिती मिळत आहे. या २९ जागांवर तीन पक्षांपैकी एकाच पक्षाने मागणी केल्याने त्या पक्षासाठी ती जागा सुटायला मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विदर्भातील २९ विधानसभा मतदारसंघांचे महाविकास आघाडीतील जागावाटप निकाली निघाल्यात जमा आहे.
यात नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, कामठी, दक्षिण पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य नागपूर विधानसभा जागांचा समावेश आहे. तर भंडारा जिल्ह्यातील साकोली, गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, वर्धा जिल्ह्यातील देवळी, वाशिम जिल्ह्यातील रिसोड अशा प्रत्येकी एक विधानसभेचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा, अमरावती, मोर्शी व बडनेरा या चार विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या एकाच घटक पक्षाने दावा केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, ब्रह्मपुरी, चिमूर, राजुरा व वरोरा या पाच विधानसभेवर एकाच पक्षाने दावा केला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोला व अकोला पूर्व या विधानसभेचा समावेश आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, राळेगाव, उमरखेड या विधानसभांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव व सिंदखेडा राजा या तीन विधानसभांचा समावेश आहे.
महायुतीला फटका बसणार?
या सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त २५ जागा मिळत असल्याचे समजते. विदर्भात भाजपला १८, तर शिवसेनेला ५ आणि राष्ट्रवादीला २ जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त ४ जागा मिळत असल्याचे समजते. यामुळे विदर्भात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.