नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ १५ सप्टेंबरला चेन्नईला पोहोचला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली एका महान विक्रमाच्या अगदी जवळ आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याला हा विक्रम करण्याची संधी आहे. यासाठी त्याला फक्त ५८ धावांची गरज आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने केवळ ५८ धावा केल्या तर तो एका खास यादीत सामील होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २६९४२ धावा आहेत. विराटने आत पुढील सामन्यात केवळ ५८ धावा करताच तो २७००० धावांचा आकडा गाठेल. अशी कामगिरी करणारा विराट कोहली जगातील चौथा फलंदाज ठरणार आहे.
यापूर्वी भारताचा सचिन तेंडुलकर, श्रीलंकेचा कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावांचा आकडा पार केला आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली चेन्नईत मेहनत घेत आहे. विराट कोहलीने पुढील सामन्यात ५८ धावा केल्या तर तो केवळ ५९२ डावात २७००० धावा पूर्ण करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वात जलद २७००० धावा असतील. तर सचिनने हा विक्रम ६२३ डावात पूर्ण केला होता.
विराटचे संघात पुनरागमन
विराट कोहली ब-याच काळानंतर कसोटी खेळताना दिसणार आहे. याआधी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत तो संघाचा भाग नव्हता. विराट कोहलीने जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तो ८ महिन्यांनंतर कसोटी सामना खेळणार आहे. यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.