23.2 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयआतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री

आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री

देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री, ५ जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आतिशी दिल्लीच्या तिस-या आणि सर्वांत कमी वयाच्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतिशी या ४३ वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत.

आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुल्तानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनले. गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन हे यापूर्वीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर कार्यरत होते.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीची सूत्रे हाती घेतली. मद्यधोरण घोटाळ््यात अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत होती. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर मुक्तता होताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी मार्लेना यांची निवड केली. त्यामुळे आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांचा पाया पडून आशीर्वाद घेतले. आतिशी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उच्चशिक्षित म्हणून ओळख
आतिशी मार्लेना या दिल्लीच्या कालकाजी मतदारसंघातील आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सरकारमध्ये त्यांच्याकडे सर्वाधिक खात्यांची जबाबदारी होती. माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आतिशी दिल्ली सरकारमधील उच्चशिक्षित मंत्र्यांपैकी एक होत्या, आता त्या मुख्यमंत्री झाल्या आहेत. आतिशी यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून इतिहासाची मास्टर्स पदवी घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR