15.3 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रदेशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध

देशाच्या प्रगतीसाठी कटिबद्ध

पंतप्रधान मोदी, पुण्यात मेट्रोचे ऑनलाईन उद्घाटन, सावित्रीबाई फुले स्मारकाचे भूमिपूजन
पुणे : प्रतिनिधी
देशाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जुन्या सरकारची कार्यपद्धती देशाला मागे घेऊन जाणारी होती. ती कार्यपद्धती आम्ही बदलून देशाला वेगाने पुढे घेऊन जात आहोत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी कोणत्याही कामाची अंमलबजावणी केली जात नव्हती. अनेक विकासकामांच्या फाईल पडून राहात होत्या. २००८ साली मेट्रोची चर्चा सुरू होती. पण आमच्या सरकारच्या काळात पुण्याची मेट्रो प्रत्यक्ष धावली, अशा शब्दांत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

येथील गणेश कला क्रीडा मंदिरात दूरदृश्य प्रणालीमार्फत पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे लोकार्पण कात्रज ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन तसेच भिडे वाड्यातील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रवास केला. ही मेट्रो मार्गिका दुपारी ४ वाजल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे उद्घाटन आणि सोलापूर येथे विमानतळाचे उद्घाटनही ऑनलाईन केले.

दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पुणे शहराच्या विकासासोबत या शहराचा वारसादेखील आम्ही जपत असून त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आम्ही केले. पुणे ज्या गतीने पुढे जात आहे, त्याच गतीने येथील सुविधा वाढवत आहोत. या पूर्वीच्या सरकारने मेट्रोचा साधा एक पिलरदेखील उभारला नाही. महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार चांगले काम करीत आहे, असे गौरवोद्गार काढले. मेट्रोचे लोकार्पण केल्याने आता पुण्यातील दाट लोकवस्ती असणारा कसबा पेठ, बुधवार पेठ, मंडई, स्वारगेट हा भाग मेट्रो मार्गीकेने जोडला गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR