नवी दिल्ली : वृत्तसंस्था
परदेशात लग्न करून गेल्यानंतर अनेक विवाहित महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले आहे. कुणाला मारहाण झाली, कुणाचा हुंड्यासाठी छळ झाला, कुठे मुलाच्या ताब्यावरून वाद झाला, तर काहींचे पासपोर्ट हिसकावून घेण्यात आले. अशा प्रकारच्या ४०० पेक्षा जास्त तक्रारी केंद्र सरकारच्या ‘एनआरआय’ सेलकडे प्राप्त झाल्या आहेत.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने यासंदर्भात वर्ष २०२२ मधील आकडेवारी जाहीर केली. अतिशय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी या सेलकडे प्राप्त झाल्या आहेत. अनेक प्रकरणात तर पती परदेशात गेल्यानंतर गायब झाल्याच्या तक्रारी आहेत.
अशा प्रकरणामध्ये समन्वयाने वैवाहिक तक्रारींचा निपटारा करण्यासाठी विविध विभागांना ३,५०० पत्रे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय यूएई, बहारिन, कतार, कुवैत, ओमान, सौदी अरब, सिंगापूर आणि कॅनडा येथे हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात आल्या आहेत.