कानपूर : वृत्तसंस्था
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका भारताने २-० ने जिंकली. यशस्वी जैस्वाल सामनावीर तर आर.अश्विन मालिकावीर ठरला. भारताने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकला. पहिल्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला होता. पण दुस-या सामन्यात विजय मिळेल की नाही याबाबत शंका होती. कारण दोन दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेला होता.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. भारताने अपेक्षेप्रमाणे बांगलादेशला दोन्ही सामन्यांत पराभवाची धूळ चारली. यासह मालिका २-० ने खिशात घातली, तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अव्वल स्थान कायम ठेवले आहे. खरं तर दुसरा कसोटी सामना ड्रॉ होईल अशीच स्थिती होती. कारण पहिल्या दिवशी फक्त ३५ षटकांचा खेळ झाला. बांगलादेशच्या ३ गडी बाद १०७ धावा होत्या.
त्यानंतर दुसरा आणि तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चौथ्या आणि पाचव्या दिवशी काय होणार अशी स्थिती होती. पण भारताने चौथ्या दिवशी कमाल केली. खासकरून भारतीय गोलंदाजांनी कमबॅक करून दिली. बांगलादेशचा संपूर्ण संघ २३३ धावांवर बाद केला. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवशीच धडाकेबाज फलंदाजी केली. जो येईल तो बांगलादेशी गोलंदाजांना ठोकून काढत होता. चौथ्या दिवशी ९ गडी बाद २८५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. भारताकडे ५२ धावांची आघाडी होती. ही आघाडी मोडून काढताना बांगलादेशने तीन गडी गमावले होते. त्यानंतर शदमान इस्लामने कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक झाल्यानंतर आकाशदीपने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
बांगलादेशने दुस-या डावात सर्व गडी बाद १४६ धावा केल्या आणि विजयासाठी ९४ धावांचे आव्हान दिले. भारताने हे आव्हान ३ गडी गमावून पूर्ण केलं. रोहित शर्माने आक्रमक सुरुवात करून देण्यासाठी प्रयत्न केला. त्याने एका चौकाराच्या मदतीने ७ चेंडूत ८ धावा केल्या. पण मेहदी हसनच्या गोलंदाजीवर हसन महमूदने त्याचा झेल घेतला आणि बाद केले. शुभमन गिल १० चेंडूत ६ धावा करून बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी मोर्चा सांभाळला.