25 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeराष्ट्रीयआप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

आप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये तुफान हाणामारी

फिरोजपूर : पंजाबमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दरम्यान, आज फिरोजपूरमध्ये उमेदवारी अर्ज भरताना आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेकही करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या हाणामारीत माजी आमदार कुलबीर सिंह झिरा यांच्यासह ८ जण जखमी झाले.

सुरक्षा दलाचे नेतृत्व करणारे एसपी (मुख्यालय) फाजिल्का रमनीश चौधरी म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. मंगळवारी शहरातील एका शाळेत २०० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासूनच उमेदवारांची रांग लागली होती. हाणामारी होण्याची शक्यता पाहता याठिकाणी आधीच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेसचे माजी आमदार कुलबीर सिंग झिरा यांचे शेकडो समर्थक मोगा रोडवरून क्लॉक टॉवरकडे कूच करत होते. पोलिसांनी कुलबीर सिंग झिरा समर्थकांना क्लॉक टॉवर चौकाजवळ अडवले, तर चौकाचौकाच्या फिरोजपूर बाजूला आमदार नरेश कटारिया यांचे पुत्र शंकर कटारिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

अचानक दगडफेक सुरू झाली
पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखताच आम आदमी पार्टीचे लोकही पोलिसांच्या समर्थनार्थ पुढे आले, त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या लोकांमध्ये वाद सुरू झाला. या वादादरम्यान काँग्रेस आमदारांच्या समर्थकांनी एक ट्रॅक्टर ट्रॉली आणली, ज्यातून अचानक दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉलीला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ती दगडफेक करत पुढे सरकली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आधी पाण्याचा फवारा मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीनमध्ये बिघाड असल्याने त्यांनी हवेत गोळीबार करून दगडफेक करणा-या लोकांना हुसकावून लावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR