लातूर : सिध्देश्वर दाताळ
आजपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात झाली असून बाजारात सध्या माती, पुजेच्या साहित्यांची विक्री केली जात आहे. मातेचा जागर करण्यासाठी लागणा-या पूजेच्या साहित्यानी बाजार सजला आहे. साहित्यांची खरेदी करण्यासाठी भक्तगणांची बाजारात लगबग सुरु झाली आहे. घट स्थापनेसाठी लागणारे मातीचे लोटके सध्या बाजारात उपलब्ध झाले असून ग्राहकांचीदेखील मातीसह साहित्य खरेदी करीत आहेत.
दुर्गा माता देवीच्या आगमनाची तयारी, गरब्याची धूम अशा अनेक गोष्टींची तयारी जोरदार झाली आहे. आज नवरात्रीनिमित्ताने दुर्गा मातेचे घरोघरी घटस्थापना उत्साहात होणार आहे. त्यासाठी घट बसविण्यासाठी मातीसह पुजेच्या साहित्याची गरज लागते. ही गरज लक्षात घेऊन शहरातील किरकोळ बाजारात काही व्यापा-यांनी विविध साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. त्या साहित्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बाजारात सध्या १० रुपयात लोटकं भर माती, पुजेचे साहित्य ३० ते ४० रूपयांत विकली जात असून शहरातील नागरीक मोठ्या उत्साहात साहित्य खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. या दिवसात मातेचा जागर करण्यासाठी लागणा-या पूजेच्या साहित्यांनी बाजार सजला आहेत.
साहित्याची खरेदी करण्यासाठी भक्तगणांची बाजारात लगबग सुरू झाली आहे. घटाला लागणा-या साहित्य, फळे, फुले, केळीची पाने, सुपारी, हळद कुंकू, कडधान्य त्याच बरोबर घटस्थापनेसाठी मातीचे घट आणि माती लागते. पूर्वी माती हवी तितकी आणि फुकट मिळत होती. मात्र शहरी भागात वाढलेल्या सिमेंटच्या जंगलात माती मिळणे अवघड झाले आहे. काही नागरीक इकडे-तिकडे माती शोधत फिरण्यापेक्षा बाजारात सहज उपलब्ध असलेली माती खरेदीला पसंती देत आहेत. यातूनच विक्रेत्यांनादेखील रोजगार उपलब्ध होत असून, एक ग्राहक कमीत कमी तीन ते चार ग्लास माती विकत घेऊन जात असून त्याबरोबर पुजेचे साहित्यही खरेदी करीत असल्याची माहिती किरकोळ विके्रत्या पार्वती घोडके यांनी दिली.
शहरातील किरकोळ बाजारात घटस्थापनेला लागणारे साहित्य अगदी कमी दरात उपल्बध होत असल्याने नागरीकांचा कल वाढला आहे. बाजारात घटस्थापनेला लागणारे साहित्य लोटके (घट) २० ते ३० रूपयांत, काळी माती एक लोटक १० रूपयांत, कड धान्य ५ ते १० रूपये एक ग्लास, आंब्याचा फाटा १० रूपयात एक नग, पिवळ्याचे कनीस १० रूपये, बदामाच्या पानाची पत्रवाळी १० रूपये एक नग
याप्रमाणे साहित्याची विक्री केली जात आहे.