मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू अझरूद्दीन अडचणीत येण्याची शक्यता आहे. अझरूद्दीन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावले आहे. अझरूद्दीन यांच्यावर हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
२० कोटी रुपयांच्या अफरातफरीचा हा आरोप असून भारताचे माजी कर्णधार अझरूद्दीन यांना गुरुवारी ईडीसमोर हजर रहावे लागणार आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये आर्थिक व्यवहारात अनियमिततेचे प्रकरण समोर आले. त्यानंतर ईडीने एचसीएच्या अधिका-यांविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. ईडीने तेलंगणात ९ ठिकाणी छापेमारी केली. अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती.
हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप आहे. अधिका-यांनी खासगी कंपन्यांना जास्त दराने कंत्राट दिले आणि असोसिएशनला यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी ईडीने तीन गुन्हे दाखल केले असून अधिक तपास केला जात आहे.
अझरूद्दीन यांच्याविरोधात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिका-यांनी तक्रार केली आहे. असोसिएशनचे सीईओ सुनील कांत बोस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. दरम्यान, मोहम्मद अझरूद्दीन यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
अझरूद्दीन यांना सप्टेंबर २०१९ मध्ये एचसीएचे अध्यक्ष करण्यात आले होते. ते जून २०२१ पर्यंत अध्यक्षपदी होते. हैदराबादमध्ये राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमसाठी डिझेल जनरेटर, अग्निशमन प्रणाली आणि इतर साहित्य खरेदीसाठी २० कोटींच्या निधीत अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ज्या सीईओंनी अझरूद्दीन यांच्यावर आरोप केले आणि तक्रार दिली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. अझरूद्दीन यांच्या वकिलांनी आरोप करणारे सूडबुद्धीने आरोप करत आहेत असे म्हटले आहे.