मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. पुढील काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. ८ ऑक्टोबरला हरियाणा, जम्मू काश्मीर निवडणुकीचे निकाल लागणार आहे. १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असं बोललं जाते.
महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे गरजेचे आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल. त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते.
अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे. मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले.