हैदराबाद : ३० नोव्हेंबर रोजी होणार्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीचा व्यस्त निवडणूक प्रचार आज (मंगळवारी) संध्याकाळी ५ वाजता संपणार आहे. राज्यात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी धावपळ करत आहेत. मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या इतर चार राज्यांच्या तुलनेत तेलंगणात निवडणुकीचा हंगाम बराच मोठा होता. तेलंगणापूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये मतदान झाले आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत.
तेलंगणात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सलग तिसर्यांदा सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) नेही सत्तेत येण्याच्या प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नाही. बीआरएस प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (केसीआर), त्यांचे पुत्र केटी रामाराव, तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्यासह २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. केसीआर कामरेड्डी आणि गजवेलमधून नशीब आजमावत आहेत तर रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामरेड्डीमधून निवडणूक लढवत आहेत.