पंढरपूर/धुळे : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर मार्गावरील कारुंडे (ता. माळशिरस) येथे पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. कार आणि टेम्पोच्या अपघातात चार जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. दरम्यान, धुळे जिल्ह्यात भरधाव डंपरने अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील लासूर्णे येथील राजेश शहा हे आपल्या कामगारांना घेऊन सातारा येथील कासपठार पाहण्यासाठी निघाले होते. ते नातेपुते येथून चुकीच्या दिशेने निघाल्याने लासूर्णे येथून २० किमी अंतरावर असणा-या कारूंडे (ता. माळशिरस) येथील पुलावर हा अपघात घडला. या अपघातात राजेश अनिल शहा (५५), दुर्गेश शंकर घोरपडे (२८), कोमल विशाल काळे (३२), शिवराज विशाल काळे (१०) हे जागीच ठार झाले तर आकाश दादा लोंढे (२५), पल्लवी बसवेश्वर पाटील (३०), अश्विनी दुर्गेश घोरपडे हे जखमी झाले.
दुर्गेश शंकर घोरपडे आणि त्यांची पत्नी अश्विनी घोरपडे आणि राजेश अनिलकुमार शहा आणि त्यांच्या सोबत काम करणारे इतर चार लोक ६ ऑक्टोबर रोजी कास पठार सातारा येथे जात होते. बलेनो गाडीतून नातेपुतेमार्गे फलटणकडे रॉंग साईडने भरधाव वेगात जात असताना समोरुन येणा-या टेम्पोने समोरून जोरदार धडक दिली. यात चौघे जागीच ठार झाले.
दरम्यान, धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर आज एक भीषण अपघात झाला. भरधाव डंपरने अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर टोलनाका येथे ही घटना घडली. गिधाडे येथून एम एच १८ डब्ल्यू ७३३१ क्रमांकाची अॅपे रिक्षा शिरपूरकडे येत होती. त्यावेळी कोंटम इंडर्शि प्रा. लिमिटेड कंपनीच्या डंपरने अॅपे रिक्षाला धडक दिली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जुन्या महामार्गावर बस जळून खाक
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खाजगी बसला अचानक आग लागली. ही घटना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने बसमधील ३३ प्रवासी बचावले. त्यांना तातडीने बसच्या खाली उतरविण्यात आले. आय.आर.बी. आणि अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु आगीत बस जळून खाक झालीे. ही बस बंगळुरूवरून जयपूरकडे जात होती. या बसला अचानक आग लागली.