नवी दिल्ली : ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’चे वित्त वर्ष २०२३-२४ साठी भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धी दर अंदाज वाढवून ६.४ टक्के केला आहे. आधी तो ६.०० टक्के होता. अर्थव्यवस्थेत मजबुतीचे संकेत दिसून येत असल्यामुळे ही वाढ ‘एस अँड पी’ने केली आहे.
एस अँड पीने वित्त वर्ष २०२४-२५ साठी भारताच्या जीडीपीचा वृद्धी दर अंदाज ६.९ टक्क्यांवरून घटवून ६.४ टक्के केला आहे. दुस-या तिमाहीत वृद्धी धिमी होऊ शकते. त्यामुळे अनुमानात घट करण्यात आली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा मंदावलेला दर आणि व्याजदरांत वाढ यामुळे चालू वर्षीच्या दुस-या तिमाहीत विकासाची गती कमी असेल. परिणामी आर्थिक वर्ष २०२५ साठी गृहीत धरलेल्या जीडीपी दरात घट केली आहे असे ‘एस अँड पी’ने म्हटले आहे.
मार्च २०२४ पर्यंत भारतात व्याज दर कपात?
एस अँड पी ग्लोबलने म्हटले आहे की, भारत मार्च २०२४पर्यंत धोरणात्मक व्याज दरात ०.१ टक्का कपात करू शकतो. गेल्या आठवड्यात मॉर्गन स्टेनलीने म्हटले होते की, भारत पुढील वर्षी जूनपर्यंत आशियाई देशांतील पहिली व्याज दर कपात करू शकतो.
इंडोनेशिया, मलेशिया या देशांतही वाढ
भारताशिवाय इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपिन्स हे देशही उत्तम वृद्धी दर प्राप्त करतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. चीनचा वृद्धी दर २०२३मध्ये ५.४ टक्के आणि २०२४ मध्ये ४.६ टक्के राहण्याची शक्यता आहे.